काय तुह्मी करता आहे ना ?? अवयवदानआयुष्यात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या घटना आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम करून जातात आणि खरे जीवन म्हणजे नेमकं काय याचा अर्थ उलगडतो असाच एक अनुभव माझ्या मित्राच्या आयुष्यात आला. एका अपघाताने त्याचे जीवनच बदलून टाकले पेशाने पत्रकार असलेला माझा मित्र "विशाल" सुट्टी साठी घरी येत असताना दुचाकीला अपघात झाला तो जखमी झाला पण सोबत असलेली आई मात्र त्याला गमवावी लागली डॉक्टरांनी आई ला "ब्रेन डेड " म्हणून घोषित केलं . या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा त्याने आपले मन घट्ट करून आईचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला . जसा त्याचा निर्णय पक्का झाला तस त्याला मदत सुद्धा खूप पटकन मिळत गेली आणि " नांदेड " शहरात दुसऱ्यादिवशी ग्रीन कॉरिडॉर करून आई अवयव दान केले गेले . हॉस्पिटल आणि डॉक्टर यांनी दाखवलेली तत्परता याचे कौतुक करावे तितुके कमीच आणि त्याने आई गमावली पण आई मुळे काही लोकांना जीवदान मिळालं आणि आई च जीवन सार्थकी लागलं याच समाधान मिळवलं . आम्ही मात्र खूप गोंधळून गेलेलो कि त्याच्या दुःखात सामिल व्हावे कि त्याने अवयव दान करण्यासाठी जी जी धावपळ केली त्याचे कौतुक करावे . पण एक मात्र नक्की त्याने आयुष्याकडे खूप डोळस पणे पाहिले आणि भावनांच्या आहारी न जाता प्रॅक्टिकल निर्णय घेतले जे योग्य ठरले याचा धडा आम्हला मिळाला . सहसा मृत्यू वर बोलणे टाळतात लोक पण आज खरंच अशी अवस्था आहे अवयव दान या विषयी बोलायचीआपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल?असे केल्यानंतर देखील तुमच्या पार्थिवाचे तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यसंस्कार करता येतात तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही हा विचार मनात येत असेल तर त्याच उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असच आहे मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरले तरी काही ठरावीक केसेस मधे ती इच्छा पुर्णत्वास नेणे अशक्य होते (जसं माझे वडील कॅन्सर पेशंट होते म्हणून त्यांचे नेत्रदान शक्य झाले नाही तसच माझ्या सासऱ्यांचे देखील शरीरात इन्फ़ेक्शन पसरल्यामुळे शक्य झाले नाही). तरी देखील आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे केव्हाही योग्यच.

अवयवदानातली अडचण म्हणजे हृदय, स्वादुपिंड व यकृत निकामी झाल्याने अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. परंतु कोणताही जिवंत माणूस दुसऱ्या कोणाला हृदय देऊ शकत नाही. जिवंत माणसाच्या स्वादुपिंड व यकृत यांचा काही भाग गरजूंच्या शरीरात रोपण करता येतो, परंतु त्यात धोका असू शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीचे हे अवयव उपलब्ध झाल्यास ते केव्हाही अधिक फायदेशीर ठरू शकतं. दुसऱ्या पद्धतीने, रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इतर लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलेल्या व ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचेच हे अवयव उपयोगात आणता येतात. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत दुरुस्त होऊ न शकणारा दोष निर्माण झाल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यास परंतु हृदय काम करीत असल्यास त्या व्यक्तीस ‘ब्रेन डेड’ घोषित केले जाते. अशा वेळेस त्या व्यक्तीचे वरील अवयव व्यवस्थित काम करत असतात व दानासाठी ते उपयुक्त ठरू शकतात. तसेच मृत्यू रुग्णालयात झालेला असल्याने डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना वेळीच जाणीव करून दिल्यास अवयवदानाच्या संख्येत खारीचा तरी वाटा उचलणं शक्य होईल. कारण एका अवयवदात्यामुळे साधारण दहा गरजू व्यक्तींना संजीवनी मिळू शकते. आणि ही संजीवनी प्रत्यक्षात गरजूंपर्यंत पोहोचवणारा मुख्य दुवा असतो मृत व्यक्तीचा नातेवाईक . याशिवाय इतर कोणत्याही कारणाने मृत्य झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान व त्वचादानही करता येते. तसेच देहदानही करता येते.भारतासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशात असे अवयव, नेत्र, त्वचा आणि संपूर्ण देह यांची खरं तर खूप मोठी गरज आहे; परंतु अनेक गैरसमज, रुग्णालयांची उदासीनता यामुळे ही गरज काही टक्केही पूर्ण होऊ शकत नाही. मृत व्यक्तीविषयी नातेवाईकांच्या मनात आदर असतो. तो आदर आपण अशा प्रकारे द्विगुणित करू शकतो अशी नातेवाईकांची मानसिकता व्हायला हवी.

बदलत्या काळातील एक महत्त्वाचा प्रश्‍न म्हणून विविध आजारांनी अवयव निकामी होण्याच्या घटनांकडे पाहिलं जातं. त्यामुळेच पूर्वीच्या किती तरी अधिक पटींनी अवयवदानाला सध्या महत्त्व आलं आहे. मागणीच्या तुलनेत दात्यांची आणि साहजिकच अवयवांची संख्या तुटपुंजी ठरत असल्याने गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर सारून अवयवदानाकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे

अवयवदान हा शब्द अनेकांना संजीवनी देणारा ठरतो. विशेषतः महत्त्वाच्या मुख्य अवयवांचा प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी अवयवदानाला अतीव महत्त्व येतं. अनेक गैरसमजांमुळे पूर्वीच्या काळी अवयवदान केलं जात नसे. परंतु अलीकडच्या काळात अवयवदानाच्या बाबतीत कमालीची जागृती झाली असून अवयवदानच नव्हे; तर देहदान करणार्‍यांच्या संख्येतही सातत्याने मोठी वाढ होत आहे; परंतु दुर्दैवाने मागणीच्या तुलनेत अवयवांची संख्या अत्यंत तोकडी आहे. वैद्यकीय क्षेत्राला सध्या त्वचेपासून अंतर्गत अवयवांपर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांची मोठी गरज भासत आहे. भारतात दर वर्षी मूत्रपिंड (किडनी), यकृत (लिव्हर), हृदय आदी अवयव निकामी झाल्यामुळे सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू होतो. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनतर्फे (नोटो) यकृत आणि मूत्रपिंड यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची यादी दर वर्षी तयार केली जाते. त्यानुसार देशात सरासरी दीड ते दोन लाख रुग्णांना मूत्रपिंडाची गरज असते. परंतु तेवढ्या प्रमाणात मूत्रपिंडं उपलब्ध नसल्यामुळे केवळ पाच हजारांपर्यंतच शस्त्रक्रिया होऊ शकतात. याखेरीज 30 हजार यकृतांची गरज असताना केवळ एक हजार रुग्णच यकृत मिळण्याबाबत सुदैवी ठरतात. याचाच अर्थ उर्वरित लोक एक तर यातना भोगत काही काळ कसंबसं आयुष्य जगत राहतात आणि नंतर मृत्युमुखी पडतात.

आधुनिक युगात अनेक रोगांचं प्रमाण वाढत असताना खरं तर निरोगी अवयव मिळणं ही गोष्टही हळूहळू कमी होत चालली आहे. साहजिकच आपले अवयव चांगले रहावेत म्हणून पहिल्यापासूनच काळजी घेणं, त्या दृष्टीने आहार, विहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री सांभाळणं ही अत्यावश्यक बाब बनली आहे. परंतु तरीही असंख्य लोक आजारग्रस्त असतात, त्यावेळी सुदृढ शरीराच्या व्यक्तींच्या अवयवांचं त्यांच्या मृत्यूपश्‍चात दान केलं जाणं ही आता काळाची गरज बनली आहे. आपल्या डोळ्यांनी दुसरी व्यक्ती जग पाहते असं म्हणण्याऐवजी त्या व्यक्तीच्या शरीराच्या सहाय्याने आपण पुन्हा एकदा जग पाहतो किंवा आपल्या अवयवाच्या रूपानं आपलं अस्तित्व कुठे तरी शाबूत राहतं ही भावना लोकांच्या मनात रुजवण्याचं कार्य सध्या सुरू आहे. आपल्याला ज्या अवयवाचा उपयोग होणार नाही, त्याचा दुसर्‍याला उपयोग झाला तर त्यात आपलं काहीच नुकसान होत नाही, असा दृष्टिकोन निर्माण केला जात आहे आणि या प्रयत्नांना चांगलंच यशही येत आहे

जास्तीत जास्त तरुण वर्गात या अवयवदान बद्दल विचार परिवर्तन केले गेले पाहिजे . कारण भविष्य हे याच मुलांच्या हातात आहे . त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जास्तीत जास्त जण जागृती केली तर भारतासारख्या देशात किडणीवाचून किंवा हृदयावाचून मरणारी लोक कमी होतील आणि अनेक लोकांना पुनर्जीवन मिळेल यात शंका नाही

14 views0 comments