भन्नाट कल्पनेचा...हॉटेल मालक

Updated: Apr 4, 2019संध्याकाळची वेळ, पुणे बेंगलोर हायवेवरुन... बारामतीच्या दिशेने चालू असलेला प्रवास... थोड्या वेळात अंधार पडू लागतो... प्रवासातील सगळ्यांना भूक लागल्यामुळे एका चांगल्या हॉटेलच्या शोधात असतानाच... एक बोर्ड अचानक दृष्टीस पडतो... त्यावर लिहिलेले असते... चव आईच्या हातची...

उत्सुकता आणि कुतूहल जागृत होते. गाडी हॉटेलजवळ थांबते. सगळ्यांची पावले हॉटेलच्या दिशेने चालू लागतात. बाहेरील बाजूला टेबलवर सगळे बसून घेतात. स्वच्छ व नीटनेटके टेबल. शेजारीच सगळीकडे मांडलेल्या झाडांच्या कुंड्या. मंजूळ स्वरात लावलेले संगीत. शेतकरी आणि बैलगाडीची उभी असणारी प्रतिकृती. शेजारीच लहान बाळासाठी असणारा पाळणा. प्रवेशद्वारातच चुलीची हुबेहूब अशी आकर्षक प्रतिकृती. पाणी पिण्यासाठी तांब्याचे ग्लास. सगळे कसे पारंपरिक, महाराष्ट्रातील संस्कृती जतन करणारे, मन शांत करणारे ते वातावरण... अगदी थोड्याच वेळात गणवेशातील एक वेटर घेऊन येतो... गूळ आणि शेंगदाण्याच्या दोन वाट्या... जेवणाची अॉर्डर न देताच...

वेटरला विचारल्यानंतर त्याने आमच्या हॉटेलची ही पद्धत असल्याचे सांगितले. मी त्याला विचारले 'मालक कुठे आहेत?' काऊंटरजवळ आहेत. या भन्नाट आणि अनोख्या कल्पनेचे आश्चर्य वाटले... मग मला राहवलेच नाही... मी पटकन काऊंटरजवळ जाऊन त्यांना माझा परिचय सांगून... हातात हात घेऊन पहिल्यांदा त्यांचे मनापासून अभिनंदन केले... आणि त्याचवेळी आतमध्ये लावलेल्या पाट्यांनी लक्ष वेधून घेतले... आता आमच्यात मनमोकळा संवाद सुरु झाला.

पुणे-बेंगलोर हायवे वरील सातारा पासून १२ किमी अंतरावर बोरगाव जवळ असणारे हॉटेल महाराजा पॕलेसच्या मालक सागर भोसले यांच्याशी...

आलेल्या ग्राहकाला गूळ शेंगदाणे देऊन स्वागत करण्याच्या "या कल्पनेमागची आपली भावना काय?" असे विचारताच चाळीस ते पंचेचाळीस वयातील, नीटनेटका पेहराव असलेले सागर भोसले सांगू लागले, "आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे जसे आपण स्वागत करतो, त्याचप्रमाणे ग्राहक हे आमच्यासाठी पाहुणेच आहेत. त्यामुळे आलेल्या ग्राहकांना आम्ही पहिल्यांदा गूळ शेंगदाणे खायला देऊन त्यांचे स्वागत करतो. उद्देश एकच गूळ आणि शेंगदाणे खाऊन त्यांचे हिमोग्लोबिन वाढावे."

एका पाटीवर लिहिले होते ताटात अन्न शिल्लक न ठेवल्यास रु. २० डिस्काऊंट मिळेल. या मागील रहस्य काय असे विचारल्यावर भोसले आनंदाने बोलू लागले, "शेतकरी आपला अन्नदाता. तो शेतात पिकवितो, त्यावेळी आपण पोटभर खातो. पण बरेच लोक जेवताना ताटात अन्न शिल्लक ठेवतात आणि अन्नाची नासाडी करतात, हे पाहून मनाला वेदना होतात आणि हे थांबविण्यासाठी ही कल्पना सुचली. प्रश्न २० रुपयाचा नाही, अन्नाच्या नासाडीचा आहे. या उदात हेतूबद्दल त्यांचे मनोमन कौतुक तर वाटलेच, पण शेतकऱ्यांबद्दल असणारी कृतज्ञता दिसून आली.

दुसरी पाटी होती... सैनिकांना जेवणात २०% डिस्काऊंट आणि सैनिकांच्या पोशाखात आल्यास १००% डिस्काऊंट. ही पाटी लावण्यामागील आपली भूमिका काय? असा प्रश्न विचारल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर एक... विलक्षण उत्साह आणि एक वेगळीच चमक... पाहायला मिळाली.

ते सांगू लागले, "आमचे कुटुंब हे सैनिकांचे आहे. आमच्या घरातील अनेक व्यक्ती सैन्यात आहेत. सैनिक जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करतात. मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडतात.... त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. केवढा विशाल दृष्टिकोन आणि मनाचा उदारपणा....

अशाच गप्पांची मैफल रंगलेली असताना मी पुढच्या प्रश्नाला हात घातला आणि विचारले, "सगळे पैशाच्या मागे लागलेले असताना येथे गरजू आणि दिव्यांगांना मोफत जेवण दिले जाते. ही पाटी लावताना मनात कोणता विचार केला होता?"

त्यावेळी सागर भोसले सांगू लागले, "गरजू आणि दिव्यांगांना मोफत जेवण दिल्याने एक प्रकारची ईश्वरसेवाच घडते. आम्हांला काही कमी पडत नाही. ग्राहकांचे समाधान हेच आमचे हित आहे. पैशापेक्षा ग्राहकांच्या समाधानाला आम्ही महत्त्व देतो. ग्राहक जेवण करून तृप्त झाला पाहिजे, मग आपोआप सगळे चांगले होते.

तुमच्या या मानवतावादी विचारांची तारीफ करावी तेवढी कमीच आहे, असे सांगून मी माझ्या टेबलापाशी जेवायला जाऊन बसलो.

आणि वेटरने जेवणाची थाळी आणून टेबलावर ठेवली... आणि तीही होती अनलिमिटेड ताटात तब्बल १४ पदार्थ

भूक लागल्यामुळे सगळ्यांनी जेवायला सुरूवात केली. अस्सल घरगुती पद्धतीने बनविलेले सर्वच पदार्थ होते स्वादिष्ट... रुचकर... चवदार...

महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी प्रवास केला, पण अशा अनोख्या व एक वेगळ्या पद्धतीने.. जेवणाऱ्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान पाहणारे हे एक... निराळेच हॉटेल.

लक्ष्मण जगताप, बारामती #भन्नाट ##बिझनेस #मार्केटिंग #Idea #Marketing

62 views0 comments