घरातल राजकारण: भाग दुसरारोजचं वर्तमानपत्रं उघडलं, तरी नावं बदलून त्याच त्या घटना दिसतात. कुणी घरातून पळून गेलं. कुणी आत्महत्या केली. कुणाचा दीर्घ आजारानं मृत्यू झाला; पण त्या आजारपणानं घर-दार विकायची पाळी कुटुंबावर आली. नापसंत मुलीशी लग्न करावं लागलं म्हणून कुणी तिला घरातून हाकलून दिलं. कुणी दुसऱ्या जाती-जमातीत लग्न केलं म्हणून रक्‍ताच्या नातलगांनीच जिवे मारलं. कुणी लग्न करून आयुष्यभर इतरांना छळलं; तर कुणी स्वतःच छळलं गेलं. कुणाचं आर्थिक नुकसान झालं, सगळ्या कुटुंबावर संकट आलं. कुणाला अधिक पैसे मिळाले, पैशांच्या धुंदीत व्यसनांनी विळखा घातला आणि संसार उद्‌ध्वस्त झाला. कुणी आपल्या अपेक्षांचं ओझं घरातल्या माणसांवर इतकं लादलं, की जीव नकोसा झाला. अरेरावी, हुकूमशाही स्वभावानं कुणी घरातलं, कुटुंबातलं प्रेम नाहीसं केलं. बाकीचे त्याच्या दहशतीखाली जगू लागले. कुणाची काळजी इतकी वाढली, की त्यांनी विष घेतलं. कुणी वाईट मार्गाला लागून स्वतःच्याच नातेवाइकांचाच घात करू लागले. कुठं नवराबायकोला संशयपिशाच्चानं घेरलं. कुठं सुनांचा, घरातल्या ज्येष्ठांचा, छोट्या मुलांचा वाट्टेल तसा छळ केला गेला. कुणाची नोकरी गेली. कुणाचा लैंगिक छळ झाला. कुणी बेताल वागून अपघात केला. कुणी व्यसनांच्या आहारी गेला. घराघरांगणिक आणि कुटुंबागणिक कहाण्या वेगवेगळ्या; पण त्यांतून निर्माण होणारे ताण-तणाव तेच आणि त्यांचे परिणामही तेच. कौटुंबिक ताणाचे अनेक दुष्परिणाम सध्या प्रकर्षानं जाणवत आहेत.


त्यातून माणसं टोकाच्या कृती करण्यासाठी प्रवृत्त होताहेत. कुटुंब, घरं विस्कळित होताहेत. कुटुंबातील माणसं एकमेकांना सुख, आनंद, सहकार्य, आपुलकी, प्रेम देण्याऐवजी दुःख कशी देऊ लागली? कुटुंबातल्या माणसांचा एकमेकांशी सुसंवाद न राहता संवादही न होण्याएवढा विसंवाद कसा निर्माण होऊ लागला? कुटुंबातली माणसं एकमेकांचे शत्रू असल्यासारखी का वागू लागली? याची उत्तरं अनेक स्तरांवर शोधावी लागतील. व्यक्तिगत अपेक्षा, रागीटपणा, संशयी वृत्ती, अप्पलपोटेपणा, स्वार्थीपणा, खडूसपणा, कटू वृत्ती, मत्सरी स्वभाव, द्वेष करणं, सतत नकारात्मक विचार करणं किंवा वागणं, आपलं तेच खरं करण्याची वृत्ती, अधिकारी वृत्ती, दुसऱ्याला दुःख देऊन, अडचणीत आणून त्यात आनंद मानण्याची असुरी वृत्ती, बेदरकार-बेपर्वा स्वभाव- असे व्यक्तिमत्त्वामधले अनेक नकारात्मक घटक दुसऱ्या व्यक्तींना एकत्र राहताना त्रासदायक ठरतात. कधी खोटं बोलणं, चोऱ्या करणं, आळ घेणं, लावालाव्या करणं, अव्यवस्थितपणा, आळशीपणा, कामाचा अजिबात उरक नसणं, दिवास्वप्न पाहणं, बदलत्या परिस्थितीशी, माणसांशी जुळवून घेता न येणं, स्वतःबद्दल अवास्तव कल्पना असणं, बढाया मारणं, लोभीपणा असणं असे कित्येक दुर्गुण कुटुंबातल्या माणसांना जाचक ठरतात.