यशस्वी आयुष्याचा कानमंत्र :भाग 11



* आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारा :जेव्हा आपण उदासीन असतो व आपल्याला हवे तसे घडत नसते, तेव्हा करण्यासारखी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वात जवळ जी व्यक्ती आहे, तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. यात आपला मित्र-मैत्रीण असेल, भावंड असतील, आई-वडील असतील किंवा अगदी आपली लहान मुलंसुद्धा. या गप्पांमध्ये कामाचा विषय असायलाच हवा असे नाही. या मनमोकळ्या गप्पांमुळे आपले साचलेले विचार मोकळे होतील व त्याच परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळेल.

*बऱ्याचदा यशाचा पल्ला खूप लांब असतो व आपण कितीही काम केले तरी यश मिळायला अजून खूप वेळ आहे या विचाराने आपण खचून जातो. अशावेळी ते यश आपल्याला मिळाल्यावर आपण किती आनंदी असू, आपल्यासमोर कोणत्याच समस्या नसतील, आपण प्रचंड आनंदी व खूश असू.. हे डोळ्यासमोर आणा. काही काळ ते सर्व चित्र डोळ्यासमोर आणून त्यात जगा; थोड्यावेळाने आपण आपोआप प्रेरित व्हाल. हे सर्व आपल्याला मिळवायचे आहे हे स्पष्ट डोळ्यासमोर दिसू लागले की त्याकडे जाण्याचा मार्गही आपण आनंदाने पार कराल.